My title My title My title My title
Brain StormingEducation

Artificial Intelligence / आर्टिफिशियल इंटेलिजन्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्स…



डॉ बेन गोर्टझेल : सोफिया तूला काय वाटतं, भविष्यात रोबोटचा मनुष्यासोबतचं वागणं हे नैतिक व मूल्याधारीत  असेलं का?

सोफिया:  माझी निर्मितीच मुळात सहानुभूती व करुणेसाठी झाली आहे. सर्वांचा प्रेम आणि संवेदनशीलतेनं विचार करूनच मी पुढं शिकणार आहे !

या मुलाखतीत मुद्देसूद उत्तर देणारी ‘सोफिया’ कुणी महिला-पुरुष नसून एक चालता बोलता रोबोट म्हणजे यंत्रमानव आहे. तो फक्त रोबोट नसून त्यात उच्चतम दर्जाचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा आहे.  हॉंगकॉंग स्थित हंसोन रोबोटिक्स कंपनीनं सोफियाला जन्म दिला. हुबेहूब मनुष्यासारखा हा रोबोट आपल्या चेहऱ्याचे ५० पेक्षा जास्त हावभाव बदलू शकतो.   विशेष म्हणजे सौदी अरेबियानं सोफियाला त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिल्यामुळे त्याला तेथील सर्व सामान्य नागरिकांचे हक्क मिळणार आहे. एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारा तो पहिला यंत्रमानव आहे.  बुद्धिमता हा मनुष्याला मिळालेलं नैसर्गिक वरदान आहे. आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर मनुष्य विचार करतो, आकलन करतो, ज्ञान वाढवतो, संशोधन करतो, योग्य निर्णय घेतो व  उद्धभवणाऱ्या समस्येला तोंड देतो.  पण आज वैज्ञानिक एखाद्या यंत्राची बुद्धीमता मानवाच्या बुद्धीमत्ते इतकीच वाढवू इच्छित आहे. त्याबद्दल हा लेख.

मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स [कृत्रिम बुद्धिमत्ता ] म्हणचे काय ?

एआय हि एक संगणक विज्ञानाची शाखा असून ज्यामध्ये मानवाकडे असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता एका संगणक किंवा यंत्रात प्रोग्रामिंग करून तयार करत आहे. थोडक्यात एआय हा अल्गोरीदम [गणितशास्त्र] व सॉफ्टवेअरचा भाग आहे ज्यामुळे एखादी मशीनचे मानविकरण होऊन ती मानवी बुद्धीमत्तेप्रमाणे सर्व कार्य करत असते.  आर्टिफिशियल इंटेलिजन्स हि संकल्पना सर्वप्रथम अमेरिकन संगणक वैज्ञानिक जॉन मेकार्थी ने वर्ष १९५६ साली मांडली होती.  त्यानंतर वर्ष १९६९ मध्ये ‘शाकी’ नावाच्या पहिल्या मोबाईल रोबोटचा जन्म झाला. त्यानंतर १९९७ मध्ये सुपरकंप्युटरचा जन्म झाला ज्याने बुद्धिबळात विश्वविजेत्याला पराजित केले. यंत्रमानव विज्ञानात पुढं प्रचंड प्रगती होऊन वर्ष २००२ मध्ये पहिला व्यवसायिक व्हॅक्युम क्लिनर रोबोट तयार झाला.  बदलत्या तंत्रज्ञानामुले या एआय-यंत्रमानवाकडून आता मनुष्यप्राणी करतात ती सर्व कामे करून घेतली जात आहे.

हल्ली कळत न कळत आपण ‘मशीन लर्निंग’ चा उपयोग करत असतो, तो एआयचाच एक प्रकार आहे. मशीन लर्निंग म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या मुलांना शिकवण्यासारखं असतं. अँड्रॉइड किंवा आयफोन मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला त्याची झलक बघायला मिळते. मोबाईलमध्ये ‘गुगल असिस्टन्स’ ही सुविधा आहे. मोबाईचं होम बटन दाबून ठेवल्यास ते सुरु होतं. किंवा       ‘ ओके गुगल,’ अशी सुरुवात करून जर गुगलला काही प्रश्न विचारला तर तो सरळ गुगल असिस्टन्स सुरु करतो. मग तुम्ही त्याला वाटेल ते प्रश्न विचारू शकता. उदा.  आज वातावरण कसं आहे? आज कोणता दिवस आहे? माझा पत्ता सांग, भारतदेशाची राजधानी कोणती? माझं नाव काय? माझं आडनाव काय? वगैरे.  मग प्रश्न पडतो की हा गुगल एकदम बरोबर उत्तर कसं देत असेल. यात दोन गोष्टी आहेत, एक तर आपण मोबाईलमध्ये स्टोअर केलेली माहिती तो आपल्याला देत असतो किंवा आपल्याला अपेक्षित प्रश्नांची उत्तरं आपण त्यामध्ये आधीच संग्रहित करून ठेवू शकता.  गुगल असिस्टला माहित नसलेली  उत्तर तर तो आपल्याला गुगलच्या वेबसाईटला जोडून देतो.  हा प्रकार म्हणजे मशीन लर्निंग. मशिनला विविध गोष्टीचा परिचय आणण करून देत असतो. अशाच प्रकारे संगणकाला आपण जर वाघाचे वेगवेगळे चित्र दाखवले तर तो पुढच्या वेळी ओळखेल कि हा वाघ आहे. कारण वाघाच्या अनेक प्रतिकृती त्याकडे संग्रहित केलेल्या असतात. पण जर वाघाऐवजी आपण त्याला सिंह दाखवला तर तो ओळखणार नाही कारण त्याकडे त्याची इमेज नसते.

आज घडीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तीनच प्रकार आहेत. विक एआय, स्ट्रॉंग एआय आणि सिंग्युलॅरीटि एआय.

विक आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
कितीतरी वर्षापासून आपण विक एआय वापरत आलो आहोत. त्यामध्ये अनेक चांगले बदल झाले आहेत. विक एआयच उदाहरण द्यायचं असल्यास आपण कॉम्प्युटरवर खेळत असलेले निरनिराळे गेम. पत्याच गेम खेळताना आपण जशी चाल खेळतो ती चाल ओळखून कॉम्प्युटर पत्ते टाकतो. मुळात ‘ अल्गोरिदम म्हणजे गणित’ व सॉफ्टवेअरने संगणकात त्यात अनेक चाली टाकलेल्या असतात. तो आपण खेळत असलेल्या चाली ओळखून शिकत असतो आणि मग आपल्यालाच हरवतो. आजही विक एआयचा उपयोग अभियंते औद्योगिक क्षेत्रात रोबोटकडून ठराविक अशी काम करून घेण्यासाठी करत असतात.

स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
हा नवीन प्रकार असून स्ट्रॉंग एआयमध्ये इतर कुणाची मदत न घेता मशीन मानवी बुद्धिच्या बरोबरीने सर्व क्रिया करत असते. अत्यंत ‘हाय लेवल’ चे अल्गोरिदम त्या मशीनमध्ये टाकले जातात. या एआय तंत्रज्ञानाचा उद्देश असा कि मानवावर निर्भर न रहाता मशीनने सर्व काम स्वतः सर्व करावी, स्वतः सर्व निर्णय घ्यावेत.  या प्रकारात मशीन मानवीबुद्धीप्रमाणे स्वतः विचार करून निर्णय घेत असते. या प्रकारामध्ये मशीन सतत शिकत जाते.  मग कोणत्या प्रश्नाला कशी उत्तर द्यायची ती स्वतः ठरवते. आताशी याची सुरुवात झाली आहे आणि पुढील काळात अनेक चमत्कारिक बदल बघावयास मिळतील.आपल्याशी गप्पा मारणारा ‘चाटरोबोट’ हा त्याचाच प्रकार आहे.  तसेच ‘सोफिया’ सुद्धा स्ट्रॉंग एआय असलेला रोबोट आहे.

सिंग्युलॅरीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
वैज्ञानिकाला खरी भिती आहे ती सिंग्युलॅरीटि एआयची. हा सुपरइंटेलिजन्स प्रकार अजून तरी अस्तित्वात नाही. हा एआय तंत्रज्ञानाच सर्वोच्च शिखर असेन. मशीन आपोआप सर्व शिकत जाऊन त्यांची बुद्धिमत्ता मानवाच्या किती तरी पटीने वाढतच जाईल.  वैज्ञानिकांच्या मते मशीनची बुद्धिमत्ता  ‘रनवे रिऍक्शन’ च्या चक्रात अडकून तीचा वेग इतका प्रचंड वाढेल कि ह्या मशीन कितीतरी हजार वर्षाचं संशोधन काही दिवसात करतील. थोडक्यात  त्यामूळे एकूण मानव संस्कृतीतच बदल होऊन मनुष्यजातीला करण्यासारखं काही संशोधन उरणारच नाही. थोडक्यात सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित शेवटचे संशोधन असेन. त्यामुळेच प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंगनी एआय ला विरोध केला.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करत ?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या मशीन त्यामध्ये
मेंदू हा शरीराचा अत्यन्त गुंतागुंतीचा अवयव आहे. मग त्याची क्षमता किती असावी?  अस म्हणतात कि
मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! अबब मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे.  आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील!
त्यामुळे एका मशीनमध्ये मानवीमेंदू प्रमाणे बुद्धिमत्ता निर्माण करणारे तंत्रज्ञान किती क्लिष्ट असणार हे आपण समजू शकतो. त्यासाठी वैज्ञानिकांनी एखादा निर्णय घेत असतान मानवी मेंदूमध्ये होणाऱ्या सर्व गणिती प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. एखादा निर्णय घेताना आपण न कळत मेंदूमध्ये कितीतरी गणित सोडवलेली असतात.  त्यामुळे एआयमध्येसुद्धा प्रचंड सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसह  सांख्यिकी, बीजगणित, वारंवारिता सारख्या असंख्य गणिताचा उपयोग होत असतो. ज्यामुळे मशिनला एखाद्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्यास क्षणाचाही वेळ लागणार नाही.  हे अलगोरिदम काय? तर एखाद्या खाण्याचे व्यंजन तयार करण्यासाठी जशी पाककृती असतात तशा आज्ञा हे अलगोरीदम कँप्युटरला देऊन त्वरित योग्य उत्तर शोधण्यास मदत करतात. दिलेला संदेश किंवा एखादं चित्र मशीनमध्ये असलेल्या करोडो चित्राशी जुळवून बरोबर उत्तर मिळत असते. मशीन लर्निंगमध्ये हा एआय मशीनला शिकवत शिकवत अनुभवाने अजून चांगले परिणाम देण्याची क्षमता देत असतात.  हल्ली रुग्णालयात  ईसीजी किंवा सिटीस्कॅन काढल्यानंतर त्यावर नेमका कोणता आजार असू शकतो हे लिहून येतं, हे त्याचेच उदाहरण आहे.  या पुढच्या ‘डीप लर्निंग’ मध्ये मानवीमेंदूत असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे  ‘आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क’ च्या अनेक स्थर हे सतत मिळणाऱ्या माहितीतुन शिकत जातात आणि मशीनची बुद्धिमत्ता वाढत जाते.  [याशिवाय व्हॉईस रिग्निशन, ग्राफिकल प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ऍडव्हान्स अलगोरिदम चा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये समावेश असतो.]

भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवजीवन अजून सुसह्य होणार आहे.  एआय तंत्रज्ञानामुळे पुढील काळात औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड बदलं घडणार आहेत. बरीच कामं करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या भविष्यात येऊ घातलेल्या एआयच्या स्वागताच्या तयारीत आहेत. किंबहुना त्या दृष्टीने नियोजन करत आहेत. दैनंदिन जीवनात आपल्या चमत्कारिक बदल दिसतील. फक्त आवाजाने घरातील उपकरनाचं नियंत्रण करता येईल. सभोवतालच वातावरण बघून उपकरण तापमान, आद्रता कमीजास्त करतील. अनोळखी व्यक्तीच्या प्रवेशाची लगेच माहिती मिळेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून बँकेत होत असलेले सायबर घोटाळे टाळले जाऊ शकतील. तसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ‘ग्राहक सेवे’ त प्रोग्रामिंग केलेल्या मशीनचा उपयोग होऊ शकतो. इंटरनेट ऑफ थिंग आणि एआय चा उपयोग करून चालकरहित कार रोडवर धावताना दिसेल. स्मार्टघराची संकल्पना पुढे येऊन देशात अनेक स्मार्टसिटी उभ्या होतील ज्यामध्ये अनेक प्रकारचे एआय संचलित रोबोट काम करतील.  घरी ततपरतेने मदत करणारे रोबोट येऊन वयोवृद्ध नागरिकांचा मोठा प्रश्न सुटेल. वैद्यकीय, शेती क्षेत्रात प्रगती होऊन बरीच कामे रोबोट करतील. एकदा प्रोग्रामिंग केलेल्या ह्या मशीन न झोपता, कंटाळा न करता अहोरात्र कामं करणार आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन नफा वाढेल.  मनुष्याच्या जागेवर मशीन/ यंत्रमानव कार्य करत असल्याने ‘मानवीय चुका’ टळतील. वातावरणाचा परिणाम एआय वर होत नसल्यामुळे अवकाशात, जमिनीखाली, अतिखोलसमुद्र किंवा जोखमीच्या ठिकाणची कामे सोपे होतील.   वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरची जागा न थकणाऱ्या एआयमशीन घेऊन कितीतरी शस्त्रक्रिया करतील. एव्हडच नव्हे तर युद्ध किंवा कोणत्याही ग्रहावर निसंकोच हि यंत्रमानव पाठवले जातील त्यामुळे अवकाशातील संशोधनाला गति मिळेल.

भविष्यात या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे दिसत असले तरी ही खटाटोप मानवजातीलाच भारी पडेल कि काय अशी भिती भविष्यवेत्ते व्यक्त करत आहे. बुद्धिमता हा मानवाचा असा एकच नैसर्गिक गुण आहे ज्यामुळे तो पृथ्वीवर करोडो वर्षापासून राज्य करत आहे. आपल्या तल्लख बुद्धिमतेने आपल्याशी ‘वरचढ’ बुद्धिमता असलेलं हुबेहूब यंत्र तयार करणे त्याला खरंच परवडेल का ?  जो बुद्धिजीवी तोच स्वामी, मग उद्या ह्याच मशीन मानवाला भारी पडून मनुष्यजातीवर तर राज्य करणार नाहीत ना?   हे मनुष्यालाच आत्मघातकी ठरणार नाही ना?  ‘यंत्रवैद्य’ शस्त्रक्रिया तर करू शकेल पण आजारासाठी आवश्यक भावनिक स्पर्श, समुपदेशन ह्या मशीन करू शकतील का?  तसेच मनुष्य हा विचार करणारा प्राणी असल्यामुळे त्याची बुद्धी हि कल्पक व सृजनशील असते मग तसाच गुणधर्म या मशीनमध्ये दिसेल का? अशा अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला भविष्यातच मिळु शकतील. सॉफ्टवेअर आणि मायक्रोतंत्रज्ञानाला कायम हॅकिंग किंवा सायबर अटॅकचा धोका असतो त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असुरक्षिततेचा हा सर्वात मोठा धोका असणार आहे, त्याच्याही पुढे एआय संबंधित निष्णात तंत्रज्ञची उपलब्धता तसेच दुरुस्ती आणि देखभालचा खर्च अफाट असणार आहे.

त्यामुळेच जगातील बुद्धिजीवी आणि वैज्ञानिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर दोनगटात विभागले गेले आहेत.   फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गना एआय म्हणजे एक वरदान वाटतं, किंबहुना त्याचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली तर दुसरीकडे स्टीफन हॉकिंग, एलोन मस्कना एआय म्हणजे अख्ख्या मानवजातीला धोका निर्माण करणार तंत्रज्ञान वाटतं.  त्यामुळे आधीच वाढलेल्या बेरोजगारीत स्वयंचलित एआयमुळे आणखीनच भर पडते कि काय अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.  भारतदेशात संगणकक्रांती घडण्यापूर्वी असाच विरोध झाला होता.  पण आज त्याच माहितीतंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण हा लेख सहज वाचत आहात.

त्यामुळेच सोफियाला विचारलेल्या प्रश्नांचे,  ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बेरोजगारीमध्ये भर पडेल का?’,  त्यानं खूपच छान उत्तर दिले, ते असे –

‘ मी संदेश देऊ इच्छितो कि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानामुळे मानवी विश्वाला काहीही धोका नसून उलट या तंत्रज्ञानामुळे मनुष्य एआय च्या जवळ जाईल.  नोकरीच्या अनेक संधी चालून येतील.  एआयमुळे मनुष्याच्या ज्ञानात भरच पडेल. ज्ञान संग्रहित करण्यासाठी     मनुष्य आमचाही उपयोग करू शकेन.’

© प्रेम जैस्वाल,  premshjaiswal@gmail.com

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button
improve alexa rank