Brain StormingSomething Different
पराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो…

पराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो…
©रवी निंबाळकर
हल्ली व्हाट्सअप्प , फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा मेसेज आला की त्याची सत्यता पडताळून न पाहता जसाच्या तसा पुढे ढकलला जातो.
पाठवलेल्या मेसेजचा परिणाम किंवा दुष्परिणाम एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा सामाजिक पातळीवर काय होतील याचा विचार न करता हल्ली काही लोकं अभ्यास न करता, विचार न करता भारंभार कसेही, काहीही संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवत आहे.
अशा सांगोपसांगी गोष्टी पसरवून तेढ निर्माण करण्या माणसांना खडे बोल सुनावताना संत तुकाराम म्हणतात,
बोलावें ते धर्मा मिळे |
बरे डोळे उघडुनी ||१||
आपणं जे बोलणार आहोत त्यात तथ्थ असले पाहिजेत, त्यात सत्यता असली पाहिजे, म्हणून ते विचारपूर्वक व अभ्यास करूनच बोलावे.
आपणं जे मत मांडत आहोत ते खरं आहे का नाही याचा पडताळा करूनच मग बोलावं.
नाहीतर उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार नसला पाहिजे.
यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात,
काशासाठी खावें शेण |
जेणें जन थुंके ते ||२||
अशा प्रकारे खोट्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे आपणच आपल्या हाताने शेण खाण्यासारखे आहे.
आपल्याला एखाद्या गोष्टीची काहीच माहिती नाही, तसेच कुठल्या प्रकारचा अभ्यास देखील नाही तरीही जे तोंडाला येईल ते बिनधास्त आणि बेमालूमपणे ठोकून देतो.
एकवेळ लोकांना हे खरं असेल असंही वाटतं, परंतु आपल्या बोलण्याचा उद्देश आणि त्यामागे लपलेला खोटारडेपणा जर समाजाच्या लक्षात आला की मग जो समाज आपल्या बोलण्याला भुलून डोक्यावर घेत होता तोच समाज आपल्या तोंडवर थुंकायला सुध्दा कमी करत नाही.
दुजे ऐसे कोण बळी |
जें या जाळी अग्नीसी ||३||
पण या निर्लज्जांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं ते आपलं ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे तत्त्व चालूच ठेवतात.
एक ना एक दिवस हा दांभिकपणा उघडकीस येतच असतो मग अशावेळी समाजापुढे कोणी एकटा बलवान ठरू शकत नाही.
समाजाच्या क्रोधाच्या अग्नीपुढे अशाप्रकारचे खोटं बोलणारे कधी भस्मसात होऊन जातील हे त्यांचे त्यांना सुध्दा कळणार नाही.
#तुका_म्हणे शूर क्षणीं |
गाढें मनी बुरीबुरी ||४||
तुकाराम महाराज म्हणतात, ‘ पराक्रमी व्यक्ती प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन आपला पराक्रम दाखवितो.
त्याला सांगावं लागतं नाही, की मी किती शूर आहे? मी किती धाडसी आहे?
युध्दाच्या वेळी त्याने दाखवून दिलेला पराक्रमच सर्व सांगत असतो. कर्तृत्ववान माणसाचं शौर्य त्याच्या कार्यातून दिसून येते.
परंतु जे गांढाळ असतात ते घरी बसूनच कुरकुरत असतात. गावाच्या कट्यावर बसून पराक्रमाच्या बढाया मारत असतात.
तुकाराम महाराज अशा लोकांना ‘गांढ्या’ हा शब्द वापरतात.
पण जे खोटं आहे, ज्याच्यावर ढोंगीपणाचा बुरखा आहे अशी लोकं समाजाला काही काळासाठी प्रभावित करतील सुध्दा परंतु ज्या वेळी हा बुरखा निघेल त्याच वेळी ह्या खोटारडेपणाची पळता भुई थोडी झाल्या शिवाय राहणार नाही.
पराक्रमी माणसं कधी बोलून दाखवणार नाहीत परंतु ज्यावेळी रणांगणावर पोहोचतील तेव्हा त्यांच्या मनगटातील जोर शत्रुंना दाखवतील.
आपल्या शस्त्राचं पाणी शत्रूला पाजतील.
परंतु जे हांडगे आहेत ते चार भिंतींच्या आत राहून तोंडाची वाफ घालवतील.
मी असं करेन, मी तसं करेन असं काही तरी बडबडत राहतील.
पराक्रम हा बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करायचा असतो.
राम कृष्ण हरी 

यशश्री क्लासेस, उस्मानाबाद