आयुर्वेदाच्या मर्यादा…!

आयुर्वेदाच्या मर्यादा सांगणारा एका वैद्याचा लेख…!
©वैद्य श्रीपाद जोशी ( MD आयुर्वेद )
विकारनामाकुशलो न जिन्हीयात् कदाचन ।
न हि सर्व विकाराणां नामतोऽस्ति ध्रुवा स्थिति: ।। (च. सू. 18/44)
चरक संहितेमध्ये हा श्लोक आलाय.
अर्थ होतो की जर एखाद्या वैद्याला संहितेमध्ये वर्णन केलेल्यापेक्षा वेगळी लक्षणं दाखवणारा नवीनच आजार एखाद्या रोग्यात आढळला, तर त्याने त्या रोग्याला कोणता आजार झालाय याविषयी रोग्याला, त्याच्या नातेवाइकांना किंवा इतर वैद्यांना माहिती देतांना, आजाराचे नाव सांगता येत नाही म्हणुन लाजू नये.
कारण सर्वच आजारांचं नाव असेल असं नाही.
सर्वच आजारांचं नाव असेल असं नाही हे कसं काय शक्य आहे?
तर चरक संहिता (त्याच न्यायाने सुश्रुत संहिताही व सध्या उपलब्ध नसलेल्या आयुर्वेदाच्या चरक सुश्रुतकाळीन संहिता) लिहील्या गेली तेव्हा मानवी आजारांच्या रोगनिदानाचं उपचाराचं क्षेत्र बाल्यावस्थेत होतं.
त्यांना मानवी शरीराची रचना व क्रिया यांचंच ज्ञान पूर्णपणे झालेलं नव्हतं, आजारांच्या लक्षणांचं तर फार दूरची गोष्ट.
चरक व सुश्रुत संहिता लिहीणारे व त्यांना शिकवणारे त्यांचे गुरू हे निःसंशय लोकोत्तर प्रतिभेचे धनी होते.
कोणत्याही उपचारपद्धतीचा प्रारंभ हा मुळात निरीक्षणांवरच आधारित असतो. (Empirical). चरक व सुश्रुतांनी जेवढे रोगी बघितलेत, त्यांच्या रोगांची लक्षणं नोंदवून ठेवलीत.
ती आजही दिसतील, ही मानवी आजारांच्या लक्षणांची व त्यानंतर उपचारांची पहिली लिखीत नोंद आहे.
आयुर्वेद हे जगातलं सर्वप्रथम चिकित्साशास्त्र आहे.
मानवी शरीर रचनेतल्या आधुनीक शास्त्रातील अनेक अवयवांची नावं आजही संस्कृतोद्भव आहेत यावरून हे सिद्ध आहे की मानवी शरीराचा सर्वप्रथम अभ्यास व नोंदी आपल्या पूर्वजांनी घेतल्या आहेत.
शरीर रचनेचा अभ्यास हा तर वैद्यकाचा पायाच असतो.
परंतू त्यांच्या वाट्याला ज्या आजारांचे रोगी बघायचे राहिले, त्या आजारांची लक्षणं त्यांनी स्वाभाविकरित्या नोंदवली नाहीत. (एकपण पेशंट न बघता आयुर्वेदाचे स्वयंघोषित तज्ञ बनण्याएवढे धूर्त नव्हते ती लोकं).
आणि त्यांना या गोष्टीची जाणिवदेखील होती. नवनवीन माहितीची वैद्यकाच्या अनुभवात भर पडत रहावी म्हणुन येणाऱ्या नवीन वैद्यांना नवीन निरीक्षणं नोंदवण्याची मोकळीक रहावी.
त्यांच्यावर संहितेमध्ये वर्णन केलेल्या आजारांच्या लक्षणांव्यतिरीक्त इतर नवं रोगलक्षण दिसलं किंवा नवीन आजार दिसला तर रोग्यासमोर गोंधळून जाण्याची वेळ येऊ नये.
आयुर्वेदाने रोगनिदान व चिकित्सेचे सांगितलेले सिद्धांत वापरून त्या रोग्याची चिकित्सा करावी हे स्वातंत्र्य व दायित्व त्यांनी येणाऱ्या नववैद्यांच्या पिढ्यांना दिलं होतं.
आयुर्वेदाच्या काळात मानवी आरोग्याचा, शरीररचनेचा अभ्यासाचा अनुभव नुकताच रांगायला लागला होता.
चरक सुश्रुताजवळ आजच्यासारखी कोणतीही यंत्रसामग्री अभ्यासासाठी उपलब्ध नव्हती. निव्वळ दृष्टीस पडणाऱ्या गोष्टींचा निरीक्षणपूर्वक अभ्यास करून त्यांनी रोगलक्षणं नोंदवलीत.
परंतू त्यांना प्रत्येक वेळी रोगलक्षणांची कारण परंपरा (विकृतीविज्ञान pathology) समजली असेलच असं नव्हतं.
आजार म्हणजे एक तर शरीर रचनेत आलेली विकृती किंवा शरीर क्रियेत. आयुर्वेदाचे शरीररचनेचे तत्कालिन ज्ञान सर्वोत्कृष्ट होते तरीही ते फारच ढोबळ व मानवी दृष्टीस जितके शक्य होते, तेवढेच मर्यादित होते.
शरीरातील अनेक लहान मोठ्या अवयवांचा आयुर्वेदाने उल्लेखदेखील केलेला नाही.
बरं जी अवयव दिसलीत, त्यांची शरीरक्रिया काय आहे? याविषयीपण आयुर्वेदाचं ज्ञान बाल्यावस्थेतच होतं, मग त्यांनी आजार उद्भवण्याची कारणमीमांसा सांगायला, प्रथम शरीरक्रियेचे काही सिद्धांत बनवलेत (वात, पित्त कफ त्रिदोष, सप्तधातू इ इ) व त्यावरून आजारांची संप्राप्ती (विकृतीविज्ञान) ठरवली.
याचा परिणाम असा झालाय की आज जेव्हा आधुनीक वैद्यकाने शरीर रचना व क्रियेचा प्रचंड अभ्यास करून आजारांच्या विकृतीविज्ञानाचा सखोल अभ्यास केला.
आजाराच्या लक्षणांची कारणपरंपरा शोधुन काढली, त्यासमोर आयुर्वेदाचे सिद्धांत फारच आदीम भासतात. आयुर्वेदाच्या रोगलक्षणशास्त्रातील लक्षणं ही शाश्वत सत्य आहेत कारण पूर्वसूरींनी ती प्रत्यक्ष रोग्यांमध्ये बघुन नोंदवली आहेत.
मात्र ती लक्षणं उद्भवण्याची जी कारणं आयुर्वेदाने अडिच तीन हजार वर्षांपूर्वी दिलीत ती सैद्धांतीक होती व मानवी शरीराच्या आजच्या प्रत्यक्ष अभ्यासासमोर टिकणारी नाहीत.
मुळात आयुर्वेदाची सुरूवातच कशी झाली असेल ते बघुया.
चरक सुश्रुतांच्या काळात ती लोक निसर्गाच्या निकट सानिध्यात रहात होती.
सगळीकडे झाडंझुडूपं होती. मानव नुकताच वन्यप्राण्यापासुन मनुष्यत्वाकडे पावलं टाकत होता.
त्यांनी वेगवेगळ्या वनस्पती खाल्ल्यावर शरीरावर काय प्रभाव दिसतो याचं निरीक्षण करायला सुरूवात केली असेल.
उदाहरणादाखल, जसे कोणी तरी, अडूळसा खाल्ल्यावर कफ बाहेर पडणारा खोकला कमी होतो, अशा खोकल्यासोबत पडणारं रक्त थांबतं हे बघितलं असेल.
त्यानी खोकल्यासोबत कफ व रक्त पडणाऱ्या रोग्यास अडूळसा द्यायला सुरूवात केली.
अडूळशाचा वापर सुरू करणाऱ्या माणसाने त्याच्या मुलाला किंवा शिष्याला अडूळसा वापरल्यामुळे खोकल्यात पडणारं रक्त व कफ थांबतो हे शिकवलं असेल, व त्या शिष्याने ही प्रॅक्टीस पुढे सुरू ठेवली व त्याच्या शिष्यालाही शिकवली.
त्याच्या शिष्यानेदेखील खोकल्यासोबत कफ व रक्त पडणाऱ्या रोग्यांमध्ये अडूळसा वापरला असेल.
परंतू त्याने त्याच्या गुरूला हा प्रश्न विचारला असेल की कोरड्या खोकल्यात अडूळसा काम करतं का? करत नसेल तर का? आणि खोकल्यासोबत पडणाऱ्या रक्तावर अडूळसा कसं काम करतं? इतर वनस्पती का बरं काम करत नाहीत तिथं?
शिष्याचं शंकासमाधान करायला, गुरूजवळ तेव्हा त्यांची निरीक्षणशक्ती, अनुभव व बुद्धीएवढीच सामग्री होती…
मग त्या प्रज्ञावान निरीक्षक गुरूने ही सगळी कारण परंपरा शिष्याला पटेल अशी समजावून सांगायला काही तथ्याधारित सिद्धांत बनवले जसे अडूळसा खुप कडू रहातो चवीला, मग त्यांनी कल्पना केली की कडू चवीमुळे तर अडूळसा काम करत नसेल?
(खोकल्यात रक्त पडणं हे गंभीर लक्षण आहे, सामान्य व्यक्तींनी या लेखातील उदाहरण वाचून घरच्या घरी अडूळसा वापरू नये, चांगल्या चेस्ट फिजीशियनचा सल्ला घ्यावा, इथे अडूळशाचं उदाहरण केवळ विषय समजाऊन सांगण्यासाठी दिलं आहे.)
आयुर्वेदीक औषधींपैकी काही औषधी प्राचिन ग्रंथात सांगिलेल्या अवस्थांमध्ये आजारांमध्ये काम करतील हे वास्तव आहे परंतू त्या तसं काम करतात यामागची आयुर्वेदाने दिलेली कारणपरंपरा आजच्या विज्ञानाच्या प्रचंड विकासामुळे उपलब्ध ज्ञानासमोर टिकू शकेल अशी नाही.
चरक सुश्रुतांनी वनौषधीची कार्यकारण परंपरा, त्या आजाराच्या लक्षणांच्या कार्यकारण परंपरेला सुसंगत वाटावी अशी गुंफली आहे. त्यासाठी उभारलेला सिद्धांताचा डोलारा म्हणजे आयुर्वेदाचं आजचं रूप.
चरकांनंतर ते आजपावेतो आयुर्वेदाच्या प्रॅक्टीश्नर्सनी थोडेफार अपवाद वगळता, नवीन आजारांची लक्षणं नोंदवलीच नाहीत. सुश्रुतांनंतर आयुर्वेदात कोणी मानवी शरीराचं शवविच्छेदन केलं नाही.
शरीररचनेच्या अभ्यासाचा महत्वपूर्ण भाग असलेला .. शरीर अवयवांची चित्रं/डायग्राम्स काढणं, अवयवांचा छेद घेणं sections घेणं हे तर कोणीच केलं नाही आयुर्वेदात.
परिणामी जगातील प्रथम चिकित्सापद्धती असलेला आयुर्वेद स्वतःचं प्रवाही रूप गमावुन कुंठित होऊन बसला.
आज बारा वर्षांपासुन आयुर्वेदाची प्रॅक्टीस करताना अशी अनेक रोगलक्षणं बघितली आहेत, ज्यांची गंधवार्ताही आयुर्वेदाला नाही.
परंतू असं वक्तव्य आयुर्वेदीक लोकांसमोर केलं की आयुर्वेदभक्त अशा प्रॅक्टीश्नरवर लेखारंभीच्या ‘विकारनामाकुशलो’ श्लोकाचं ब्रह्मास्त्र उपसुन तुटून पडतात.
या एका श्लोकाचा गैरवापर करत आयुर्वेदीक लोकांनी आपलं क्लिनीकल अज्ञान लपवलंय हजारो वर्ष, परिणामी आज आयुर्वेदाची विश्वसनीयता रसातळाला जाऊन पोहोचली आहे.
जनसामान्य विश्वास ठेऊन आयुर्वेदीक उपचार घेत नाहीत, कारण अनेक आजारांची लक्षणंच माहिती नसणारा आयुर्वेदीक प्रॅक्टीश्नर क्लिनीकमध्ये पेशंटमध्ये ते लक्षण बघुन किती आत्मविश्वासाने रोगनिदान करू शकेल?
आणि रोगनिदानच करता येत नसेल तर चिकित्सा काय करणार?
चरकांनी जेव्हा लिहीलाय हा श्लोक, त्याक्षणी तो अत्यंत सुसंगत होता. मात्र या श्लोकाचा समयोचित वापर न केल्यामुळे आजच्या आयुर्वेदीक प्रॅक्टीश्नरच्या नशिबी भलतंच नष्टचर्य आलंय हे मात्र नक्की !
श्रीपाद जोशी
एम डी आयुर्वेद
वाशीम
सोर्स: WhatsApp