Something Different
कहाणी एक कुकर की …
कहाणी एक कुकर की … 
©Nandini Nitesh Rajapurkar
दोन शेजारणी भाजी आणायला निघतात. एकीच्या घरी पाहुणे जेवायला येणार असल्याने तिला झटपट होणारी भाजी घ्यायची असते.
दोघी बाजारात जायला निघतात.
पहिली- काय मग कसली गडबड? 

दुसरी- काही नाही गावाकडून पाहुणे आलेत ना त्यांच्या साठी छोले पुरी बनवायचा बेत आहे. म्हंटल छोले आणावेत.

पहिली- अच्छा… मज्जा आहे बुवा पाव्हण्यांची..!! 

दुसरी- हो भाजी बनवली की तुम्हाला पण देते पाठवून..

पहिली- हो चालेलं ना…बाकी स्वयंपाक पण झाला का? 

दुसरी-हो होईल आता. बहीण पण आलीये घरात लांबची, तिला म्हंटल आधी भात वरण बनवून घेऊ. आपण येई पर्यंत कुकर होईल.
डाळ- तांदूळ दिलेत तिला काढून लावला असेल तिने कुकर… 

पहिली- चला मग पटकन जाऊन येऊ. 

झटपट भाज्या घेऊन दोघी दाराजवळ पोहोचतात न पोहोचतात तोच,
दुसऱ्या शेजारणीला तिसरी शेजारीण’
“तुमचा कुकर उडाला बघा.. कसला मोठा आवाज झाला.. सगळ्या घरभर भातवरण झालंय..” 





तसं दोघींचं हृदय गपकन बंद पडायला येतं.. पळतच दोघी तीच घर गाठतात…





बघतात तर पाहुण्यांसाठी बनवलेला वरण भात वरती सिलिंग खात होत.. आणि दारापासून वरणाचा सडा पडला होता तो वेगळाच..!.
दुसरी सावकाश पावलं टाकत आत शिरते आणि बहिणीला विचारते,
दुसरी- “काय ग कसं झालं हे?” 

“काय माहीत ताई… ” 

पहिली- ” नशीब बाकीचे सगळे बाहेर होते. लागलं नाही ना तुम्हाला?” 

“नाही लागलं” 

एव्हाना दुसरीने पाणी टाकून फरशी पूसायला सुरुवात केली..
पहिली- “घाबरला असाल ना तुम्ही? बापरे किती डेंजर झालं असत” 

“नाही तर… मला सवय आहे..” 

दोन्ही शेजारणी चमकून..
“म्हणजे???” 









“या आधी पण मी कुकर उडवलेत असे..” 

दोघी जणी किंचाळून… “किती???” 



“तीन” 

“म्हणजे हा…. चौथा…”





दोन्ही शेजारणी तीच उत्तर ऐकून गार पडल्या…
पहिली- “वाह.. बाकी हे टॅलेंट पण भारी आहे… तुम्हाला ना पाकड्यांच्या बॉर्डरवर पाठवायला पाहिजे खूप सारे कुकर देऊन.. त्याचा तिकडे खरा उपयोग होईल.. “

एवढ्यात दुसरी फडक फेकून देत जोरात किंचाळली-
“बाहेर घेऊन जा हिला आत्ताच.. नाहीतर हिलाच उडवीन मी” 


