Brain StormingSomething Different
The Hunt – शिकार

The Hunt – शिकार
©टीम नेटभेट
चित्ता जेव्हा शिकार करतो तेव्हा तो एका नजरेत सावज टिपतो नि सुसाट धावत त्याचा पाठलाग करून ती शिकार मिळवतो.
चित्त्याला हे सहज शक्य असतं कारण, तो वेगाने धावण्याचं आपलं नैसर्गिक अंगभूत कौशल्य वापरून ही शिकार करणार असतो.
पण तुम्ही जंगलचा राजा सिंहाला कधी शिकार करताना पाहिलंय? त्याचा शिकार करण्याचा अंदाज आणि थाट दोन्हीही काही निराळंच !
चित्ता हा अंगभूत कौशल्य वापरून शिकार करतो तर सिंह हा रणनीती वापरून शिकार करतो. चित्ता हा सर्वात वेगाने पळणारा प्राणी आहे.
तो तब्बल 110 किलोमीटर्स (70 मीटर ताशी वेग) एवढ्या प्रचंड ताशी वेगाने पळतो. त्याच्या अंगभूत अशा या अद्वितीय कौशल्यामुळे तो अत्यंत आक्रमकतेने शिकार करू शकतो.
अर्थातच त्यामुळेच त्याला कोणत्याही प्रकारची रणनीती शिकारीपूर्वी आखावी लागतच नाही.
मात्र, दुसरीकडे सिंहाला त्याची शक्ती आणि ताकद दोन्हीही वापरून शिकार करावी लागते.
सिंह हा तुलनेने कमी गतीने शिकार करणारा असतो आणि त्याचं शिकार करणं हे चित्त्याइतकं आक्रमकही नसतं.
मात्र, स्वतःमधील हीच कमतरता ओळखून सिंह नीट रणनीती आखून मग शिकार करायला सरसावतो.
मित्रांनो, तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे, युद्धात, उद्योगव्यवसायात वा प्राणीजगतात अशा पद्धतीने नेहमीच रणनीती आखून आपल्या कमतरतांवर मात करत दणदणीत विजय मिळवता येतो.
अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यांनी शत्रूला ओळखून नीट रणनीती आखून त्याच्यावर विजय मिळवला.
आता हेच उदाहरण घ्या ना, ताशी 80 किमी वेगाने सुसाट धावणाऱ्या वाईल्डबीस्ट सारख्या अफाट वेगवान प्राण्याचीही काहीवेळा सिंह यशस्वी शिकार करतो ते केवळ योग्य रणनीती आखूनच !
स्वतःतील कमतरता ओळखूनच हा जंगलचा राजा वाईल्ड बीस्टसारख्या प्राण्यांचा त्यांच्या मागून हलके हलके पाठलाग करतो.
एका मोक्याच्या क्षणी जेव्हा जनावर पूर्ण टप्प्यात आलंय हे लक्षात येतं तेव्हा त्याच्यावर झेपावत हल्ला करतो आणि शिकार साधतो.
सिंह जसा भांडून शिकार मिळवण्यात तरबेज असतो तसा चित्ता नसतो.. चित्ता केवळ वेगाने धावण्यात तरबेज असतो.
हेच ओऴखून, सिंह चित्त्याला त्याची शिकार करू देतो आणि नंतर चाणाक्षपणे चित्त्यानी शिकार केलेलं सावज त्याच्याशी लढून त्याच्याकडून हिसकावून घेतो.
फ्लिपकार्ट ने अत्यंत प्रयत्नपूर्वक भारतामध्ये इकॉमर्स प्रस्थापित केले. ग्राहकांची ऑनलाईन खरेदीची मानसिकता तयार केली.
ऍमेझॉन हे पाहत होती, त्यांनी फ्लिपकार्टला काम करू दिलं आणि इकॉमर्स साठी भारत तयार झाला तेव्हाच ऍमेझॉन भारतात आली.
फ्लिपकार्ट ने केलेल्या शिकारीवर ऍमेझॉन ने हक्क सांगितला.
सुन त्झु या चिनी सेनापतीचे art of war हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे.
त्यामध्ये सांगितलंय की, “जर तुम्ही स्वतःला नीट ओळखत असाल आणि जर तुम्ही तुमच्या शत्रूलाही नेमकं ओळखत असाल तर मग तुम्हाला लढाईची भीती वाटायलाच नको.”
आणि याउलट, “जर तुम्ही केवळ स्वतःलाच ओळखत असाल आणि तुम्हाला तुमच्या शत्रूची जाण नसेल तर जिकण्याची आणि हरण्याची शक्यता समान होते”
आणि जर, “तुम्ही स्वतःलाही ओळखत नसाल आणि तुमच्या शत्रूलाही, तर प्रत्येक युद्धात तुमचाच बळी जाईल हे निश्चित ..!”
हीच बाब व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत आणि नाती जपणाऱ्यांच्याही बाबतीत तंतोतंत लागू होते. त्यामुळेच जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर;
अंगभूत कौशल्यांवरच फक्त अवलंबून राहू नका तर रणनीती आखा आणि लढाई जिंका .. क्या समझे ?
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
Source :Whatsapp