Post's
QWERTY कीबोर्ड एक सवय…!

QWERTY कीबोर्ड एक सवय…!
©सलिल सुधाकर चौधरी
मित्रांनो, हा लेख तुम्ही कोणत्या तरी मोबाइल किंवा लॅपटॉपवर वाचत असाल. ज्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर तुम्ही वाचत आहात त्याचा कीबोर्ड लेआऊट तुम्ही नीट पाहिला आहे का ?
रोज आपण वापरत असणाऱ्या कीबोर्डवर इंग्रजी अक्षरांचा वर्णमालेनुसार म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार ABCDE या क्रमाने अक्षर असायला हवी.
परंतु आपण आपला कीबोर्ड नीट पहिला तर पहिले अक्षर Q नंतर W त्यानंतर E अशी अक्षर दिसत आहेत.
म्हणजेच ABCDE च्याऐवजी QWERTY या अक्षरांनी आपल्या कीबोर्डची सुरुवात होते. असा कीबोर्ड का बनवला गेला असेल, हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का ?
याची सुरुवात खरंतर टाईप रायटर पासून झाली. सुरुवातीचा काळात टंकलेखन सुरू झाल्यावर ABCDE या क्रमाने कीबोर्डवर अक्षर होती.
टंकलेखनात कोणतेही अक्षर टाईप केल्यानंतर ते कागदावर जोरात दाबले जाऊन मुद्रित होत होते. टाईप रायटर ही एक अतिशय गुंतागुंतीची मशीन होती.
जर टाईप करण्याचा वेग वाढला तर यामुळे टंकलेखन करताना प्रत्येक अक्षराची हालचाल करणारे अनेक लिव्हर्स एकमेकात अडकायचे.
यातून टंकलेखन करताना चुकीची अक्षर टाइप होत आणि एकदंर खूप वेळ वाया जात असे. यावर उपाय काय करावा असा प्रश्न पडू लागला. टाईप करण्याचा वेग कमी करून हा प्रश्न सुटणार नव्हता.
यावर उपाय म्हणून जी अक्षरे जास्त वापरावी लागतात आणि शक्यतो एकामागोमाग वापरावी लागतात त्यांना कीबोर्डच्या दोन्ही बाजूना अशा प्रकारे बसवण्यात आले की एकाच जागी दोन लिव्हर्स आजूबाजूला वापरले जाणार नाहीत.
यासाठी अनेक प्रयोग केल्यानंतर QWERTY हा कीबोर्ड क्रम पहिल्यांदा अस्तित्वात आला.
गमंत अशी झाली की QWERTY टाइपिंग ची अशी काही सवय झाली की पुढच्या काही काळात संगणक आल्यानंतर संगणकामध्येही QWERTY याच कीबोर्डचा वापर करण्यात आला.
आज ही आपण QWERT हाच कीबोर्ड मोबाइल, लॅपटॉपमध्ये वापरत आहोत.
सवय एक अशी गोष्ट असते की ती आपल्याला obvious वाटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावते. सवयीने कामे भराभर होतातही पण कामे वेगळ्या पद्धतीने देखील करता येतात याचा विचारच केला जात नाही.
नेटभेट मध्ये 2 वर्षांपूर्वी आम्ही एक प्रोसेस बनविली होती. त्यात काही त्रुटी होत्या म्हणून आम्ही काही बदल केले.
त्यामुळे प्रोसेस थोडी लांबली. पण पुढे त्याची सवय झाली.
गेल्याच महिन्यात इंटरनेट वर सर्च करत असताना मला एक नवीन सॉफ्टवेअर मिळाले, जे वापरून आमच्या या प्रोसेसला पूर्णपणे ऑटोमॅटिक करता आले आणि आता त्याला काही सेकंदांचा वेळ लागतो.
जर हे सॉफ्टवेअर मिळाले नसते तर आम्ही असेच “सवयीने” काही सेकंदांचे काम करण्यात 15-20 मिनिटे वाया घालवत बसलो असतो.
तेव्हा मित्रानो आपल्या दैनंदिन आयुष्यात , बिझनेस मध्ये , कामाच्या ठिकाणी अशा किती “QWERTY” सवयी आपण वापरत आहोत याचा आढावा घ्या ! बघा, खूप काही सुधारणा अचानक समोर दिसू लागतील.
©सलिल सुधाकर चौधरी
Source: WhatsApp Messages
Photo Credit: https://depositphotos.com/