भूत पिशाच्च की मानसिक व्याधी…?
©किरण फाटक
मी त्यावेळी साधारण १५-१६ वर्षांचा होतो. आमची आई तिच्या जुन्या विचित्र कथा सांगायची. बाळंतपणात हॉस्पिटलमध्ये तिला एक नेकटाय लावलेला माणूस कोपऱ्यात उभा असलेला दिसायचा.
आई काही मानसिक रोगी नव्हती. मग असे झाले, आमच्या वडिलांच्या ओळखीचे एक भूत मास्तर होते. त्यांनी काहीतरी करून बंदोबस्त केला व नंतर आईला कधीही तो माणूस दिसला नाही.
त्यांनी नेमके काय केले ते आम्हाला माहीत नाही.
माझ्या धाडसी आत्याने सुद्धा एक चित्त थरारक गोष्ट सांगितली. ती कुठल्यातरी संस्थान असलेल्या गावात गेली असता, राजवाड्यात शिरताच भव्य सिंहासनावर बसलेले महाराज दिसले.
ते उंची कपडे व दागिन्यांनी नटले होते. पण ते इतर कुणालाच दिसले नाहीत. असाच एक अनुभव आमच्या आत्यालाच पुन्हा आला.
कोणीतरी तिच्याबरोबर चालत असता त्या माणसाचे तळपाय तिला उलटे दिसले. त्याच्याबरोबर ती बरेच अंतर चालली सुद्धा. पण नंतर घाबरली.
आत्याला दिसणाऱ्या भुताचा बंदोबस्त ही त्या भूत मास्तरांनीच केला.
माझा मामा सुद्धा भूतमास्तर होता. तो म्हणायचा ,” चला पोरांनो, तुम्हाला भुते पहायची आहेत का ?
चला माझ्याबरोबर स्मशानात. चार मंत्र म्हटले की शेकडो भुते धावत येतील.
आपल्याकडे खायला मागतील.” पण ते धाडस आम्ही कधीच केले नाही. मामाने हे भूत मास्तरचे रीतसर शिक्षण एका मुस्लिम गुरूकडून घेतले होते.
माझे आईचे वडील देखील ते रहात असलेल्या पंचक्रोशीत भूत मास्तर म्हणून खूप प्रसिद्ध होते. माझ्या आईने अनेक भूते काढताना बघितले होते.
त्याचे ती अगदी शास्त्रोक्त वर्णन करायची. त्यातील बरेच लोक बरे होऊन घरी गेले.
आमच्या ओळखीच्या एक वृद्ध बाईंना असाच एक माणूस, जिकडे नजर टाकावी तिकडे,संध्याकाळी दिसतो.
माझ्या माहितीतल्या एका माणसाच्या कानात कोणीतरी बोलल्याचे आवाज यायचे. तो बसला की आवाज यायचा “हां, बसला वाटते”.
तो उठून ऑफिसला निघाला की आवाज यायचा ,” हां, आता निघाला का ऑफिसला ?”. अशा प्रकारे त्याच्या प्रत्येक हालचालीची दखल तो आवाज घेत असे.
मग त्या माणसाने “श्रीगुरुचरित्र” पारायण करून यावर विजय मिळविला. कारण तो पूर्ण शहाणा होता. एका मोठ्या कंपनीत जबाबदारीच्या पोस्टवर होता.
तिथल्या जबाबदाऱ्या, या विचित्र काळातही त्याने चांगल्या सांभाळल्या.
काही काही वेळा विनाकारण अंग शहारू लागते. अनामिक भीतीने शर आणि मन भरून जाते. काही केल्या हे शहारणे थांबत नाही.
आपल्यालाही कळत नाही आपल्याला हे असे का होते. रोखून रोखले जात नाही. काही वेळाने हे शहारणे ओसरत जाते.
समाजात एक असा वर्ग आहे की जो भूत,पिशाच्च या गोष्टींना अजिबात मानत नाही. असं काही नसतच, असे त्यांचे ठाम मत असते.
हे सगळे मनाचे खेळ आहेत असे ते म्हणतात.
मनावर झालेले आघात, असहाय्यता, गरिबी, कोंडी यामुळे मन बिथरते, घाबरते आणि त्यातून एक नवे भासमान जग आकार घेते,असे ते मानतात.
पण ज्या लोकांना तसे विचित्र अनुभव आले त्यांनी काय करावे. त्यांची मानसिक स्थिती खूप भक्कम असते. मग असे का होते.
हा वास्तुदोष असावा का ? भुते खरेच असतात का ? अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या “गुरुचरित्र” या ग्रंथात देखील भूत पिशाच्च यांचा उल्लेख आला आहे. “भूत प्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तही नासती,तुटती चिंता, आनंदे भिमदर्शने ||” ह्या संत रामदासांनी रचलेल्या मारुती स्तोत्रात देखील भुताचा उल्लेख आला आहे. असे अनेक दाखले देता येतील.
माझे जे कोणी मनोविकार तज्ञ अथवा मानसोपचार सल्लागार(counsilor) या साईट वर मित्र आहेत त्यांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
किरण फाटक…११/०२/२०२२
RELATED POSTS
View all
