My title My title My title My title
Something Different

तुकाराम बीजः सदेह वैकुंठगमन करणारे संतश्रेष्ठ…

तुकाराम बीजः सदेह वैकुंठगमन करणारे संतश्रेष्ठ…




ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस… वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले.

संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या.

श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, श्रीकृष्ण पारध्याचा बाण लागल्यानंतर सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते;

रंतु मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते. तुकाराम बीजनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा…



संत तुकारामांचे पूर्वायुष्य:
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते.

तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त.

घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली.

सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात.

इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जग रहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले.



व्यवहाराची थोर शिकवण देणारे तुकोबा:
तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो. तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात.

सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे. चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला.

व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्यही उलगडून दाखविले.

संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख-दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही.



निर्भीड व साक्षात्कारी संतकवी:
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला.

संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने तुकोबा स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे.

तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखना बरोबरच गवळणीही रचल्या.



दांभिकतेवर कडक शब्दांत वार करणारे संतश्रेष्ठ:
खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. सर्वसामान्य समाजाला जागृत करून देवधर्म संबंधी योग्य मते पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले.

देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना खरा धर्म व नवी दिशा देण्याचे काम संत तुकारामांनी केले.

संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरत आहेत.



संत तुकाराम गाथा:
संत तुकारामांची गाथा म्हणजे सर्व सामान्यांची गीता आहे. ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे.

ज्ञानेश्वरा नंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली.

भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी सर्वसामान्य समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. त्यांची अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली.

अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. त्यांच्यामुळेच सामाजिक परिवर्तनाचे वादळ सर्वत्र पसरले. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली.

सर्वसामान्य समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठगमन केले.



ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या फेसबुक वाँलवरुन साभार

सोर्स : WhatsApp 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button
improve alexa rank