Brain StormingSomething Different
लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण…

‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’
©रवी निंबाळकर
काही लोकं, सज्जनतेचा व सोज्वळपणाचा बुरखा पांघरून चार चौघांत मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी गप्पा मारतात. परंतु ते जसं बोलतात त्याप्रमाणे अजिबात वागत नाहीत.
ते म्हणतात ना, ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.’
अशी लोकं बोलताना वाटते, ‘अरे ! किती भला माणूस आहे हा! किती तत्ववादी आहे.’ अशा बोलघेवड्या दांभिक माणसाच्या सान्निध्यात आलेला प्रत्येकजण सुरूवाती सुरूवातीला अगदी भारावून जातो, त्याच्या विचारांवरती भाळून त्याला मनोमन आपला मार्गदर्शक मानायलाही सुरू करतो.
परंतु अगदी काही दिवसांतच या ढोंग्याचा खरा चेहरा समोर येतो तेव्हा, तो भक्त या दांभिका पासून नुसता दूरच जात नाही तर त्याला शिव्या सुद्धा घालायला लागतो.
“दुरुन डोंगर साजरे”, या म्हणीप्रमाणे तत्वज्ञानाच्या गप्पा मारणारा माणूस दूरच्या लोकांसाठी आकर्षणांचा केंद्र असू शकतो, परंतु या भामट्याच्या जवळ असणाऱ्या लोकांना हा माणूस कोणत्या चालीचा आहे, हे पक्क माहीत असतं.
किर्तन – प्रवचनातून हा दांभिक म्हणेल ही, ‘परावया नारी रखूमाई समान.’
परंतु, किर्तन संपलं की (कधी कधी तर चालू किर्तनात सुध्दा…) स्त्रीयांना वाईट नजरेने न्याहाळत बसेल.
अशा दुटप्पी माणसांविषयी तुकाराम महाराज म्हणतात,
मुखें बोले ब्रह्मज्ञान |
मनीं धन आणि मान ||१||
स्वत:ला बुद्धिमान समजणारा (जरा जास्तच) माणूस बोलताना नेहमी मोठ्या मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत असतो.
मला सर्व काही समजतं अशा आविर्भावात वागत असतो. असा अति शहाणा, कायम दुसऱ्यांना उपदेशांचे ढोस पाजेल. परंतु स्वत: बोलतो तसा अजिबात वागणार मात्र नाही.
दुसऱ्यांना उपदेश देताना पुराणांतील दाखले देऊन समजवून सांगत असतो की, ‘अहंकार सोडून द्या, धन-संपत्तीचा मोह टाळा.’
परंतु त्याच्या मनात मात्र मान- सन्मान, पद, पैसा, प्रतिष्ठा याची अभिलाषा बाळगून असतो.
बोलताना तो असं ही म्हणत असतो की, ‘मला कसल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही, जे काही करतो ते समाजासाठीच करतो.’
परंतु जर समजा एखाद्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत याचं नावंच छापलं नसेल तर हा फुगून बसेल, आयोजकां वरती टिका करेल.
असा हा माणूस, एखाद्या कार्यक्रमात मानपानासाठी रूसून सुध्दा बसेल.
ऐशियाचि करितां सेवा |
काय सुख होय जीवा ||२||
अशा ढोंगी, दुटप्पी तसेच स्वत:ला ब्रह्मज्ञानी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित महाराजांची सेवा किंवा भक्ती केल्यामुळे नेमकं कोणतं असं सुख प्राप्त होतं ?
असल्या थोतांड अन् भावनेचा बाजार मांडणाऱ्या बुआ-बापूंची भक्ती केल्यानं कुठलंच सुख मिळणार नाही, परंतु अशा ढोंग्यांची मर्जी सांभाळता सांभाळता जीवाची ओढाताण मात्र जरूर होईल.
आहे ते समाधान सुद्धा गमावण्याची पाळी येईल.
क्षणा क्षणाला तत्व अन् धोरणं बदलणाऱ्यांची पुजा करून सुख मिळणार ते कसलं!
पोटासाठी संत |
झाले कलींत बहूत ||३||
आजच्या काळात देवाची भक्ती करण्यासाठी नव्हे तर पोटभरू संतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
यांना आध्यात्म, देव, देवपूजा इत्यादी गोष्टींशी काहीच देणेघेणे नसतं.
यांचा डोळा असतो तो यांच्याच भक्तांच्या संपत्तीवर अन् कधी कधी तर त्यांच्या स्त्रीयांवर सुध्दा.
काही-काही जण तर बाबा, बुवा, बापू अशी टोपणनाव लावून समाजाच्या डोळ्यात धूळ फेकणारी नाटकी मंडळी आहेत.
यातील काही जण म्हणतात की, ‘मी प्रवचना साठी किंवा किर्तनासाठी एक रूपया सुध्दा घेत नाही.
परंतु मी, तेवढं मंदिराचं बांधकाम काढलं आहे, ते खूप पुण्याचं काम आहे, तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेवढी पावती फाडा.
अहो! मला काही नको, पण मंदिरासाठी द्या,’ असं म्हणून ही भाविकांची लुबाडणूक करतात.
विरळा ऐसा कोणी |
तुका म्हणे त्यासि लोटांगणीं ||४||
तुकाराम महाराज म्हणतात, ‘ या सर्वांच्या पलिकडे जाऊन जो कोणी संत असेल, तर मी स्वत: जाऊन त्याच्या पायावर लोटांगण घेईन. कारण, जसा बोलतो तसा वागणारा संत-महात्मा आज मिळणं दुर्मिळ झालं आहे.’
हजारो अंधभक्ताचा मेळावा जमवून त्यांच्या समोर मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गप्पा मारणं सोपं आहे.
परंतु त्यातील एखादी गोष्ट आचरणात आणणं भलतं अवघड आहे.
कारण, स्वार्थ आला की तत्वाला तिलांजली देणारे अनेक ढोंगी लोक जागोजागी आढळून येत आहेत.
राम कृष्ण हरी 

यशश्री क्लासेस, उस्मानाबाद